संगणक साक्षरता अभियान २०२३

पार्श्वभूमी

जागतिक पातळीवर होत असलेल्या डिजिटल क्रांतीच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने शालेय स्तरावर या विषयाचे आधुनिक ज्ञान मिळावे या उद्देशाने आर्थिक साहाय्य देऊन अनेक मान्यवर शाळांमध्ये अटल टिंकरिंग प्रयोगशाळा उभारल्या आहेत. त्यातील सेवा सुविधांचा लाभ भोवतालच्या शाळांतील विद्यार्थी तसेच समाजाला व्हावा अशी अपेक्षा होती. शालेय अभ्यासक्रमात समावेश नसल्याने आणि तज्ज्ञ शिक्षक उपलब्ध न झाल्याने प्रत्यक्षात या प्रयोगशाळा केवळ प्रदर्शनीय ठरल्या आहेत. शिवाय यातले सर्व तंत्रज्ञान इंग्रजी भाषेत असल्याने विद्यार्थ्यांना ते शिकणे अवघड जाते. या सुविधांचा योग्य उपयोग व्हावयाचा असेल तर प्रादेशिक भाय़ेत हे शिक्षण मिळण्याची सोय करण्याची आवश्यकता आहे. महाराष्ट्रात लोकव्यवहाराची भाषा मराठी असल्याने हे आधुनिक तंत्रज्ञान मराठीतून देता आले पाहिजे.

१) संगणक शिक्षण ही सध्याच्या काळातील एक महत्वाची काळाची गरज बनली आहे. पण संगणकात मुख्यत्वे इंग्रजी भाषेचा वापर होत असल्याने मराठी माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थी या ज्ञानापासून वंचित राहतात. महाराष्ट्रात शहरी भागात इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळा सुरू झाल्या असल्या तरी नगरपालिका, जिल्हापरिषद आणि ग्रामीण भागातील शाळात मराठी माध्यमच वापरले जाते. अशा शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मराठी माध्यमातून संगणक व इंटरनेटचे प्राथमिक शिक्षण आणि भारतीय इन्स्क्रीप्ट कीबोर्ड वापरून मराठी टायपिंग करण्याचे शिक्षण दिले तरच त्याना संगणकाचा अभ्यासात प्रभावीपणे वापर करता येईल.

२) ज्ञानदीप मंडळाची स्थापना.

प्रत्येक शाळेमध्ये ज्ञानदीप फौंडेशनतर्फे एक समन्वयक शिक्षक आणि काही विद्यार्थी यांचा गट करून ज्ञानदीप मंडळ सुरू करून त्यांना योग्य ते मार्गदर्शन देण्याची योजना आहे. कोणत्याही विषयाचे अद्ययावत ज्ञान इंटरनेटवर सहज आणि मोफत मिळत असल्याने सर्व विषयांच्या शिक्षकांनी या ज्ञानाचा शोध घेऊन त्याचा संगणकावर साठा करून आपल्या शिक्षणात त्याचा उपयोग करावा, तसेच आपल्या अनुभवावर आधारित लेख इंटरनेटवर प्रसिद्ध करावेत आणि इंटरनेटचा वापर ज्ञानार्जनासाठी करता येतो याची माहिती विद्यार्थ्यांना सांगावी यासाठी ज्ञानदीप मंडळ कार्य करेल.

३) इंटरनेट सुविधा नसणार्‍या शाळांमधील संगणकावर ज्ञानदीप फौंडेशनतर्फे विविध विषयांची संकलित माहिती व चित्रफिती सीडीच्या स्वरूपात दिली जाईल व शिक्षकांना त्याच्या वापराविषयी प्रशिक्षण दिले जाईल.

४) ज्ञानदीप मंडळात शाळेतील शिक्षकांव्यतिरिक्त स्थानिक पातळीवरील व्यक्ती वा संस्था यांना सहभागी होता येईल.

प्रशिक्षण अभ्यासक्रम :-

अपेक्षित शैक्षणिक ग्रुप – इयत्ता ५ वी ते ९ वी.

अ) संगणकाचा वापर :-

१) संगणक चालू व बंद करणे, फोल्डर तयार करणे, रिनेम करणे, डिलीट करणे. कॉम्प्युटर ड्राईव्हची माहिती देणे, कॉपी / पेस्ट करणे, स्कॅन व प्रिंट करणे.

२) पेंट प्रोग्राम वापरून चित्रे काढणे, नोटपॅड व वर्डपॅडवर माहिती टाईप करणे व सेव्ह करणे

३) संगणकावर मराठी टाईपिंग करणे, स्वतःचे लेख लिहिणे.

४) एम.एस.ऑफिसची ओळख.

ब) इंटरनेटचा वापर :-

१) इंटरनेटची ओळख, माहितीचा शोध घेणे तसेच ती माहिती संकलित करणे.  .

२) ज्ञानदीप फौंडेशनच्या शिक्षणविषयक विविध वेबसाईटची माहिती देणे.

क) संगणक प्रोग्रॅमिंग

१) पायथॉन, टर्टल ग्रफिक्स वापरून प्रश्न सोडविणे वा आकृत्या व चित्रे काढणे

२) स्क्रॅच प्रोग्रॅमिंगचा वापर करून ध्वनीचित्रफीत वा संगणक खेळ बनविणे  

ड) अटल ज्ञानदीप प्रयोगशाळा

१) इलेक्ट्रॉनिक कांपोनंटची माहिती

२) इलेक्ट्रॉनिक सर्कीट जोडून अर्ड्युनोच्या साहाय्याने विविध प्रयोग करणे

३) दूरसंवेदकांचा वापर करून उपयुक्त इलेक्ट्रॉनिक साधने तयार करणे.

४) ड्रोन, स्वयंचलित उपकरणे व ३ डी प्रिंटर यांची रचना व कार्य

अभ्यासक्रमाचा कालावधी

तीन ते सहा महिने

विद्यार्थ्यांची इयत्ता तसेच त्याना शालेय अभ्यासक्रमाव्यतिकिक्त उपलब्ध होऊ शकणारा वेळ यावर वरील प्रशिक्षण अभ्यासक्रमात आवश्यक ते बदल केले जातील. शाळांना यासाठी काही सदस्यता वर्गणी भरून या योजनेचा लाभ घेता येईल. त्याबाबतची सर्व माहिती लवकरच ज्ञानदीपच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येईल.

ना नफा ना तोटा या तत्वावर सर्वांच्या सक्रीय सहभागानेच हा प्रकल्प चालविला जाणार असल्याने शाळांच्य प्रतिसादावरच याचे यश अवलंबून राहणार आहे.

या योजनेत सहभागी होणा-या शाळांमध्ये शिक्षक व विद्यार्थी यांचा गट करून त्या ज्ञानदीप मंडळाच्या नावे एक अटल ज्ञानदीप प्रयोगसंच दिला जाईल आणि एक पाच पानांची शाळेची वेबसाईट य़ा वेबसाईटवर प्रसिद्ध केली जाईल. या ऑनलाईन सुविधेमुळे विविध शाळांतील शिक्षक, विद्यार्थी एकत्र शिक्षण, संशोधन आणि विकासप्रकल्प करू शकतील.

या योजनेत विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाचा लाभ घेता येईल. शिक्षक व उद्योग व्यवसायातील तज्ज्ञ यांना मार्गदर्शन करता येईल व आपले शिक्षण जागतिक दर्जाचे होईल.

सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे भारतातील शिक्षक, विद्यार्थी आणि प्रगत राष्ट्रांतील शिक्षक, विद्यार्थी यांच्यात परस्पर संवाद व ज्ञानाची देवघेव होऊ शकेल.

— डॉ. सु. वि. रानडे, ज्ञानदीप, सांगली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *