कृत्रिम बुद्धीमत्तेचे अखिल मानवजातीवर नवे संकट

विज्ञान तंत्रज्ञानाच्या साहाय्याने यंत्रमानव निर्माण करण्यात माणसाने स्पृहणीय यश मिळविले आहे. आतापर्यंत असे यंत्रमानव माणसाच्या आज्ञेनुसार काम करीत होते. कारण बुद्धीचा मूलभूत अधिकार माणसाने आपल्याकडेच ठेवला होता. मात्र ही बुद्धी मेंदूतील मज्जातंतूनी कशी कार्यान्वित होते (न्यूरल नेटवर्क)  याचा अभ्यास करून माहितीचे विश्लेषण करून निर्णय देण्याची क्षमता असणारी कृत्रिम बुद्धीमत्ता विकसित झाल्याने य़ंत्रेच मनुष्यबळाला पर्याय होऊन बेरोजगारीचे फार मोठे संकट नव्या पिढीपुढे येऊन ठाकले आहे.

 या कृत्रिम बुद्धीमत्तेच्या विकासात अग्रेसर असणा-या गुगलमधील मुख्य संशोधक हिंटन, ज्यांना ‘एआयचे गॉडफादर’ म्हटले जाते,  त्यांनी या धोक्याची कल्पना आल्याने आपली नोकरी सोडली असून आता ते जागतिक पातळीवर या धोक्याविषयी जनजागृती करीत आहेत. मात्र या स्पर्धेच्या युगात गुगलपाठोपाठ इतर सर्व बलाढ्य आंतरराष्ट्रीय कंपन्या आपल्या हजारो संगणक अभियंत्यांच्या मदतीने कृत्रिम बुद्धीमत्तेचा उपयोग आरोग्य, वाहतूक, उद्योग याबरोबरच युद्धसामुग्री निर्माण करण्यात गुंतल्या असून त्यात तारतम्य वा नियंत्रणाचा अभाव आहे. औद्योगिक क्रांतीमुळे श्रमजीवी कामगारांच्या नोक-या गेल्या आता कृत्रिम बुद्धीमत्तेच्या वापराने बुद्धीचे काम करणा-या पांढरपेशी, उच्चभ्रू आणि मानाचे काम करणा-या शिक्षक, व्यावसायिक, डॉक्टर,वकील, संशोधक एवढेच नव्हे तर असे संशोधन करणा-या संगणकतज्ज्ञांच्या नोकरीवर गदा येणार असून मानवाचे पुढील भवितव्य कृत्रिम बुद्धीमत्ता असणारी यंत्रेच ठरविणार आहेत.

त्याहीपेक्षा मोठा धोका आंतरराष्ट्रीय य़ुद्धाचा असल्याचे युक्रेन – रशिया संघर्षावरून लक्षात येत आहे. कारण येथे बुद्धीमान घातक यंत्रेच एकमेकांशी लढत आहेत. त्यांना मानवता वा नैतिकतेचे शिक्षण नसल्याने विजयासाठी सर्वनाश झाला तरी त्यांना त्याचे दुःख नाही कारण त्यांना बुद्धी आणि शक्ती असली तरी मानवी मन नाही. कोणी विकृत मनाचा राष्ट्रप्रमुख हा सर्वनाश घडवू शकतो. सध्या अमेरिकेत घडत असलेली आत्मघाती  सामुहिक हत्याकांडाची उदाहरणे, काश्मीरमधील दहशतवादी कारवाया, सूदानमधील गृहयुद्ध या त्याच्याच छोट्या धोक्याच्या घंटा आहेत.

माणूस यातून काही शिकेल काय ? कृत्रिम बुद्धीमत्तेला आपल्या बुद्धीमत्तेच्या नियंत्रणाखाली ठेऊ शकेल काय ? दुर्दैवाने एका माणसाच्या बुद्धीलाआता काही महत्व उरले नसून सामुहिक बुद्धीमत्तेलाच हे शक्य आहे. त्यासाठी एखाद्या नव्या महात्मा गांधींसारख्या दृष्ट्या नेत्याची गरज आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *